About

 

वर्ल्डकपची फायनल पाहताना फार धास्ती वाटत होती. सचिन बाद झाल्यानंतर आपण वर्ल्डकप गमावतो की काय, असंच वाटत होतं; पण हा सामना आपण जिंकला. सुरुवातीला मुंबईत आलो त्यावेळी मला क्रिकेटमधलं काही कळत नव्हतं; पण एक लक्षात आलं, क्रिकेटचा सामना आपण जिंकलो की, वर्तमानपत्रांचा खप वाढतो. आपला संघ जिंकला की, पाहिलेल्या सामन्याबद्दल वाचायला लोकांना आवडतं. यामुळे वर्तमानपत्रांच्या खपात पाच ते दहा टक्क्यांचा फरक पडतो, असा माझा अनुभव आहे. शहरी भागामध्ये हे प्रमाण दहा टक्के, तर ग्रामीण भागात हे प्रमाण पाच टक्के इतकं असतं. याच्या उलट आपण सामना हरलो, तर वर्तमानपत्रांचा खप कमी होतो. हे लक्षात आल्यानंतर मी क्रिकेटचे सामना बारकाईने पाहू लागतो.
विक्रेता ते वितरक आणि वितरक ते वर्तमानपत्रांचा मालक या प्रवासात अशा अनेक गोष्टी मी शिकत गेलो आणि अजूनही शिकत आहे. वृत्तपत्रसृष्टीत झपाट्याने बदल होत आहेत. नवनवीन संधी आणि आव्हानं समोर येत आहेत. अशा परिस्थितीत काळानुरूप योग्य ते बदल केले नाहीत तर आपण स्पर्धेत नक्की मागे पडू शकतो. म्हणूनच काळानुसार योग्य ते बदल आपण करायलाच हवेत, या मताचा मी आहे. त्याच्यासाठी सदैव सजग राहणं, नवनवीन गोष्टी शिकत राहणं आवश्यक आहे.
माझं वय ७० च्या पुढे गेलं आहे. या वयात मी आराम करावा असा सल्ला मला बरेच जण देतात; पण मला स्वस्थ बसून राहणं आवडत नाही. जमतही नाही. काही दिवसांपूर्वीची गोष्ट, मी आमच्या शेतात चांगलं चार-पाच तास काम केलं. खरं तर उन्हातान्हात काम करून मला थकवा यायला हवा होता; पण तसं झालं नाही. उलट मला फार छान वाटलं. तरुण असताना मी कधी उन्हातान्हाची पर्वा करून काम केलं नाही.
झाडांना वाढीसाठी ऊन, पाणी आवश्यक आहे; पण हा निसर्गाचा नियम फक्त झाडांसाठीच लागू असतो असं नाही. माणसांनाही हा नियम तितकाच लागू पडतो. आपण पाण्यावाचून जगू शकत नाही. तसेच ऊनही आपल्याला आवश्यक असतं. उन्हात काम करायचं नाही, असं म्हणून आपण कायम सावलीत विसावा घेत राहिलो तर कसं जमेल? कायम आराम, सुख-सोयी यांचा विचार करायचा, त्याचवेळी पैसा अधिक कसा मिळेल ते पाहायचं, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य नाही. काबाडकष्ट करणारा आणि अजिबात काम न करणारा अशा दोघांना समोरासमोर उभा केलं तर त्यांच्यातला फरक तुमच्या लक्षात येईल. कष्टाळू इसम तजेलदार असतो, निरोगी असतो, त्याचं आयुष्यमानही कष्ट न करणार्‍यापेक्षा अधिक असतं.
मला कष्ट करणारी माणसं आवडतात. मी त्यांच्यातलाच आहे. मी स्वत:ला माझ्या कामगारांपेक्षा वेगळा मानत नाही. माझं जेवणखाण वगैरे सारं काही त्यांच्याबरोबर होतं. कधी काही खाणं वगैरे मागवायची वेळ आली की, जे मी खाईन, तेच त्यांच्यासाठीही मागवलं जातं. कष्ट करणार्‍या कुणालाही कमी लेखणं, हलक्या प्रतीचं मानणं चुकीचं आहे.
वितरणाच्या व्यवसायात आम्ही अठरा-अठरा तास काम करतो. रात्रीच्या वेळी वर्तमानपत्रं छापून झाली की, मग त्याची पार्सल्स तयार करून ती शहरापासून गावाखेड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठा प्रवास मोजक्या तासांमध्ये करावा लागतो. या व्यवसायातल्या मंडळींना वितरण व्यवस्थित होत आहे की नाही, याची खबरदारी घ्यावी लागते. मध्येच कधी तरी तुम्हाला वेळ मिळतो आणि या काळात तुम्हाला विश्रांती घेण्याची संधी मिळते; पण त्यासाठी मला कधी लॉज किंवा हॉटेलवर मुक्काम करण्याची वेळ आली नाही, हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. ठिकठिकाणी विखुरलेल्या माझ्या विक्रेत्यांच्या घरी मी विश्रांतीसाठी जातो. त्यांच्या घरात माझं अगदी आपुलकीने स्वागत होतं; कारण आमचं नातंच तितकं घट्ट आहे.
मी या व्यवसायात आलो तो विक्रेता म्हणूनच. पुढे वितरक म्हणून काम करताना या अनुभवाचा फार मोठा फायदा झाला. माझ्यासाठी वितरण करत असलेल्या कामगारांना मी पगार नाही, कमिशन दिलं. म्हणजे वर्तमानपत्राचा जो काही खप होईल, त्यावर काही टक्के कमिशन कामगारांना देण्यास मी सुरुवात केली. याआधी वितरण व्यवसायात कामगारांना अशारीतीने कमिशन दिलं जात नव्हतं. मुंबईत मीच ही पद्धत सुरू केली. माझ्या आधी वितरण व्यवसायातल्या मंडळींकडे पगारी कामगार असायचे. त्याचा मला फार मोठा फायदाही झाला. महाराष्ट्रातही मी या पद्धतीचाच अवलंब करत आहे. मुंबईत काही अपवाद वगळता अजूनही मी याच पद्धतीने वर्तमानपत्रांचं वितरण करत आहे.
मी विक्रेता असताना, अधिक मिळकत व्हावी म्हणून प्रयत्न करायला तयार असायचो. त्यामुळे विक्री करणार्‍यांना कमिशन मिळालं तर ते अधिक उत्साहाने अधिक काळजीपूर्वक काम करतील, याची मला खात्री होती. माझा हा निर्णय अचूक ठरला. विक्री करणार्‍या कामगारांनी माझा विश्‍वास सार्थ ठरवून या निर्णयाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. यामुळे माझा व्यवसाय अल्पावधीत विस्तारला. मात्र, माझे कामगार आणि विक्रेत्यांशी संबंध केवळ ‘व्यावसायिक’ राहिले नाहीत, तर ते घरोब्याचे होते. म्हणूनच माझं कधीही त्यांच्या घरी स्वागत होत असतं. मी त्यांना आपल्या घरातले मानतो आणि तेही मला त्यांच्यातलेच मानतात.
मालक बनून कामगारांच्या डोक्यावर बसणं मला मान्य नाही. कामगारांच्या कष्टामुळे कुठलाही व्यवसाय मोठा होतो, यावर माझा ठाम विश्‍वास आहे. मी स्वत: कुठलंही काम कमी प्रतीचं किंवा हलकं मानत नाही. वेळ पडलीच तर आजही मी माझ्या कामगारांसोबत काम करत असतो. कष्टाची लाज बाळगून कुणीही मोठं होऊ शकतं नाही.

वृत्तपत्र व्यवसायात जोरदार स्पर्धा सुरू झालेली आहे. पुढच्या काळात ही स्पर्धा अधिकच तीव्र होईल, असं दिसतं. नव्या वर्तमानपत्रांच्या येण्यानं जुन्या वर्तमानपत्रांच्या खपावर परिणाम होत नाही, हे माझं मत आहे; पण तरीही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कष्ट करावे लागतात, हेदेखील नाकारता येत नाही. म्हणूनच मिळालेल्या यशावर मी समाधानी असलो, तरी मी थांबलो नाही. अजूनही माझं काम सुरू असतं; कारण मिळालेलं यश टिकवण्याचं आणि वाढवण्याचं आव्हानही तितकंच खडतर असतं, असं मला वाटतं.
माझा इतरांशी स्पर्धा करण्यावर तसा विश्‍वासही नाही. आपण आपल्या व्यवसायात काळानुरूप बदल करत राहिलो की, स्पर्धेची चिंता करण्याचं कारण उरत नाही. म्हणून स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, मी माझ्या वर्तमानपत्रांचा विकास आणि वाढ याच्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो. या धोरणाचा मला लाभ झालेला आहे. यामुळं आपण व्यवसायातलं आपलं स्थान टिकवून ठेवू शकतो, शिवाय आपली प्रगतीही होत राहते. यशस्वी वितरक आणि वर्तमानपत्रांचे मालक म्हणून मला काही प्रश्‍न वारंवार विचारले जातात. वृत्तपत्रसृष्टीत पुढे काय होईल, हा अशा वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांपैकी एक. नवनवीन दैनिके येत असताना, हा प्रश्‍न अनेकवार समोर येणं अगदी स्वाभाविक आहे. विशेषत: सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात दैनिकं आणि नियतकालिकं येत असताना, या प्रश्‍नाची तीव्रता वाढणारच. याबाबतचं माझं मत अगदी स्पष्ट आहे. दैनिकांची गर्दी कितीही वाढली तरी काही ठराविक दैनिकं या गर्दीमध्ये टिकून राहतील. त्यांच्या स्थानाला धोका नसेल. बायकांना एखाद्या वर्तमानपत्राची सवय लागली की, ते वर्तमानपत्र सोडण्याची त्यांची तयारी नसते. म्हणूनच या स्पर्धेच्या काळातही अनेक वर्तमानपत्रं आपलं स्थान टिकवून असल्याचं आपण पाहतो. माझ्या दैनिकांच्या अनुभवावरून सांगतो, गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या तीव्र स्पर्धेचा परिणाम या दैनिकांवर झालेला नाही, त्याचं हेच कारण आहे. म्हणूनच स्पर्धा तीव्र झाली, तरी बायकांमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करणार्‍या दैनिकांना त्याची चिंता करण्याचं कारण नाही, असं मला वाटतं.सन १९९४ मध्ये ‘मुंबई चौफेर’ हे सायंदैनिक आणि ‘आपला वार्ताहर’ हे दैनिक मी सुरू केलं. १९९५ मध्ये ‘यशोभूमी’ हे हिंदी भाषिक दैनिक सुरू झालं. त्यानंतर १९९९ मध्ये ‘पुण्यनगरी’ची सुरुवात झाली. ‘कर्नाटक मल्या’ हे कन्नड वर्तमानपत्र आम्ही विकत घेतले. आज ‘अंबिका प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्स’ची रीडरशिप १ कोटी ३४ लाखांहून अधिक असल्याचा ‘एआयआरएस’चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. नामवंत मराठी, इंग्रजी, तेलगू, गुजराती दैनिकांचं आणि साप्ताहिकांचं वितरण आम्ही करतो. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि लातूरमध्ये आमचे प्रिंटिंग प्रेस उभे राहिलेले आहेत. माझी मुलंदेखील याच व्यवसायात आहेत. त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे माझ्या या व्यवसायाचा विस्तार होत राहिला. जवळपास दीड दशकाच्या कालावधीत माझ्या व्यवसायाचा विकास आणि विस्तार झाला. सुरुवातीला वीस-पंचवीस जणांना बरोबर घेऊन मी कार्य सुरू केले होते. आता माझ्याकडील कामगारांची संख्या त्याच्या कित्येक पटींनी वाढली आहे. ज्यावेळी मी माझ्या व्यवसायाचा विचार करतो, त्यावेळी माझ्यासाठी काम करणारा कामगार हा त्यातला महत्त्वाचा घटक असतो. कुठलंही काम छोटं नाही, हे माझं तत्त्व माझ्या कामगारांनीही स्वीकारलेलं आहे.
मी इतका मोठा होईन, या उंचीवर जाईन, असं कधीही मला वाटलं नव्हतं. स्वप्नातही मी तशी कधी कल्पना केली नव्हती. अगदी सुरुवातीच्या काळात मला इतकं यश मिळणार आहे, हे जर कुणी सांगितलं असतं, तर त्यावर मी विश्‍वास ठेवला नसता; पण प्रगतीवर माझा विश्‍वास आहे. आहे त्यात समाधान मानून सुखात राहणं मला मान्य नाही. आपल्याला जर प्रगती करायची असेल तर त्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतात. पुढे जायचं असेल तर निवांतपणे काम करून जमत नाही. त्यामुळं कष्टाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. सर्वसाधारणपणे माणूस सुखाच्या शोधात असतो आणि त्यासाठी त्याला पैसादेखील हवा असतो. कष्ट टाळून आपल्याला पैसा किंवा यश कसं मिळू शकेल? योग्य दिशेनं केलेल्या कष्टाचं फळ मिळतं. वेळ फुकट घालवण्यानं आपल्या हातात काही येत नाही. आता आठवण झाली म्हणून मी स्वतंत्रपणे वितरण करू लागल्यानंतर, अगदी सुरुवातीच्या काळात माझ्याकडे फारसं काम नसायचं. हा वेळ मी माझ्या आरामासाठीही वापरू शकलो असतो; पण मला हे जमत नसे. मी या फावल्या वेळातही इतर वितरकांना मदत करत असे. यातून मला काही आर्थिक फायदा किंवा मिळकत होत नव्हती. माझी तशी अपेक्षाही नव्हती. पण आपल्याकडे वेळ आहे. त्याचा वापर करून आपण त्यांना थोडीफार मदत करूया, ही भावना त्यामागे होती. अशा विचारांमुळं माझी कष्ट करण्याची सवय कायम राहिली. जे कुणी यशस्वी झालेले आहेत, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा, कामाच्या पद्धतीचा अभ्यास
करणं हा माझा छंद होता. एखादा माणूस मोठा का व कसा झाला, हे जाणून घ्यायला मला अतिशय आवडतं. त्याचे चांगले गुण आपण स्वीकारले, तर आपणही नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असा माझा
अनुभवसिद्ध विश्‍वास आहे.